स्वयंपाकघर..
नेहमी सर्वांना रडवणारा कांदा तेलावर गुलाबी-सोनेरी रंगावर मऊ भाजला जात होता.. शेजारीच मोठ्ठ्या पातेल्यात लोणी कढत होत. त्यात टाकलेल्या विड्याच्या पानामुळे वेगळाच तरीही हवाहवासा वाटणारा वास येत होता. तिने बागेतून कोथिंबीर आणि कढीपत्त्याच्या काड्या खुडून आणल्या. कोथिंबीरीची पोपटी रंगाची ताजी पानं आणि कोवळी-कोवळी देठ हळूच बाजूला ठेवली. कढीपत्त्याच्या हिरव्यागार पानांचा मस्त वास तिने श्वासात भरून घेतला आणि नारळ खवणायला लागली..
करवंटीच्या आतल्या बाजूला तपकिरी- पांढर कोरीव काम आणि समोरच्या ताटात पांढऱ्या, मऊ-मऊ खोबऱ्याचा छोटा ढीग ..
करंगुळीच्या पेराएवढ्या, नाजूक-साजूक लाल-हिरव्या मिरच्या, उग्र वासाच्या लसूण पाकळ्या आणि गोल-गोल कापलेल आलं..
कुकरमध्ये जायची वाट बघत बसलेला रोवळीतला धुतलेला तांदूळ..
स्वयंपाकघर..
तिचं अनभिषिक्त साम्राज्य...
इथे ती अन्न रांधते..
आग्रह करकरून जेऊ घालते..
अगदी पोटभर..
भाजी निवडणाऱ्या, फोडणी घालणाऱ्या त्या कृश, सुरकुतलेल्या हातांमध्ये अपरंपार प्रेम आणि माया असते..
जेवणाला खरी चव येते ती त्यामुळेच...
ती जेव्हा पाठीवर हात फिरवून "सावकाश जेव हो!!" म्हणते ना तेव्हा खर सांगू चार घास जास्तच जातात...
"भाजी छान झालीये! " असं ऐकताना तिला कृतार्थ वाटत राहत...
आणि समोरचं माणूस आवडीने पोटभर जेवत तेव्हा तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो...
ती....
आई, मावशी, काकी, आत्या , आजी, मामी, ताई...
या सगळ्याच आपल्या अन्नपूर्णा आहेत..
चैत्र शुद्ध प्रतिपदेला आपल्याकडे चैत्रागौर बसवतात, अंगणात चैत्रांगणाची रांगोळी काढतात आणि नंतर वासंतिक हळदीकुंकू करतात..
त्यानिमित्त माझा माता अन्नपूर्णेला कृतज्ञतापूर्वक साष्टांग नमस्कार....
देव्हार्यातल्याही आणि स्वयंपाकघरातल्याही..!!!